पैठण, (प्रतिनिधी) : येथील शशीविहार वसाहतीच्या गेट समोर शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास कारने दुचाकीला जोराची धडक दिली, हि धडक इतकी जबरदस्त होती, की या मध्ये दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यांचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे व जि.प. प्रा. शाळेचे शिक्षक संभाजी कर्डिले यांचा समावेश आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भाऊसाहेब पिसे, ५५ व संभाजी कर्डिले, ५४ हे दोघे मोटर दुचाकीवरून शशी विहार येथील वसाहतीत असलेल्या घरी जात होते. वसाहतीच्या गेट समोर रस्ता ओलांडत असताना शेवगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एम. एच. १७ - एझेड १०४५ ) दुचाकीला उडवले, ही धडक इतकी जबरदस्त होती, की यामध्ये संत एकनाथचे संचालक भाऊसाहेब पिसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिक्षक संभाजी कर्डिले यांना शासकीय दवाखान्यात हलविले असता, डॉक्टरानी तपासून त्यांना मृत्यू घोषित केले. अपघात होताच कार चालक फरार झाला.
दरम्यान भाऊसाहेब पिसे यांचा अंत्यविधी त्यांच्या गावी आवडे उंचेगाव येथील स्मशान भूमित करण्यात आला. त्यांच्या अंत्यविधीसाठी तालुक्यातील विविध समाजाचे नागरिक विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे.